
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर तर सुरत येथील सासर असलेल्या विवाहितेला मुलीच होत असल्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीसह नऊ जणांवर नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, आयशाबी मोहसीन खान (वय-२१) रा. सुरत ह.मु.नशिराबाद ता. जळगाव यांचे १० एप्रिल २०१८ रोजी सुरत येथील मोहसीन खान मेहमूद खान यांच्याशी विवाह झाला. पहिले काही महिने चांगले गेले. दरम्यान संसारवेलीवर एक मुलगी झाली. मात्र मुलगी झाल्याचा मनात राग ठेवून पती मोहसीन खान यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तसचे सासू रूकसानाबी मेहमूद खान, नणंद नजरानाबी मेहमूद खान, जेठ आसीफ खान, दिर वसीम खान, जेठ इमरान खान मेहमूद खान, यासमिनबी आरीफ खान, रूबीनाबी सैय्यद युसूफ, नणंद शाहीनबी सईद आणि नंदोई सईद केलेवाले रा. निंभोरा ता. रावेर यांनी वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.


