नशिराबादचा आदर्श जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने घ्यावा- ना. गुलाबराव पाटील (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । गावाच्या विकासाच्या मुद्यावरून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम आणि अपक्षांनी एकत्र येऊन शेवटच्या दिवशी माघार घेण्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद असून जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने याचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शेवटच्या दिवशी नशिराबादच्या सर्वच्या सर्व ८२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर या सर्वांचे कौतुक करतांना ते बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरूच होती. या पार्श्‍वभूमिवर, काल नशिराबाद येथे झालेल्या बैठकीत सर्व उमेदवारांनी अर्ज माघार घ्यावे असा निर्णय झाला. या अनुषंगाने आज सायंकाळी सर्वांनी अर्ज मागे घेतले. यामुळे नशिराबाद येथील निवडणूक रद्द झाली आहे.

आपल्या मतदारसंघातील महत्वाचे गाव असणार्‍या नशिराबदकरांनी दाखविलेल्या एकजुटीचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची कौतुक केले. त्यांनी तहसील कार्यालयात माघार घेणार्‍यांचा सत्कार केला. याप्रसंगी ना. पाटील म्हणाले की, मी पाठपुरावा केल्यामुळे नशिराबाद येथे नगरपंचायत मंजूर झाली. यासोबत राज्यातील १३ ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. तथापि, निवडणुकीची नियमित प्रक्रिया सुरूच राहिल्याने थोडे गोंधळाचे वातावरण होते. या पार्श्‍वभूमिवर, वेळ व पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी नशिराबाद येथील सर्वच्या सर्व ८२ उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम आदी पक्षांसह अपक्षांनीही एकजुट दाखवत माघार घेण्याचा निर्णय घेतला असून याचे ना. पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले.

दरम्यान, नशिराबाद येथे लवकरच नगरपंचायतीची निवडणूक होणार असून तेथे विकासाचे नवीन पर्व सुरू होईल असा आशावाद देखील ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. तसेच काही नेते ईडी व बीडीवरून वाद करत असले तरी यापेक्षा विकास महत्वाचा असल्याचा टोला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मारला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, शिवसेनेचे विकास धनगर, चेतन बर्‍हाटे, मनसेचे मुकुंदा रोटे, बापू चौधरी, आसिफ मुब्बलिग, चंद्रकांत भोळे, डायमंड टेलर, फिरोज कुरेशी यांची उपस्थिती होती.

खालील व्हिडीओत पहा ना. गुलाबराव पाटील नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/692321191647230

Protected Content