नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना पात्रतेच्या विकासाला संधी मिळणार- प्रा.शिरीष कुळकर्णी

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नव्या शौक्षणिक धोरणात व्यापक विचार करण्यात आला असून केवळ गुण अथवा पदवी प्राप्त करण्याऐवजी योग्यता प्राप्त करण्यासाठीचे शिक्षण दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना पात्रतेच्या विकासाला संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन गुजरातच्या वल्लभ विद्यानगर येथील सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.शिरीष कुळकर्णी यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्दितीय नामविस्तार दिनानिमित्त मंगळवार 11 ऑगस्ट रोजी प्रा. कुलकर्णी यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी उपस्थिती होती.

उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर बोलतांना प्रा.कुलकर्णी म्हणाले की, 34 वर्षानंतर नवे शौक्षणिक धोरण जाहिर झाले आहे. हे राबवतांना आव्हाने खूप असले तरी संधी भरपूर आहेत. विद्यार्थी कच्चा राहू नये यासाठी पूर्वप्राथमिक शिक्षणापासून धोरणात विचार करण्यात आला आहे. स्थानिक मातृभाषेला महत्त्व देण्यात आले आहे. आताच्या धोरणात विद्यार्थी केवळ परीक्षार्थी आहे. नव्या धोरणात गुण अथवा पदवी मिळवण्यासाठी शिक्षण दिले जाणार नसून योग्यता प्राप्त करण्यासाठी दिले जाणार आहे. ज्या विद्याथ्र्याला ज्या विषयाची आवड आहे ते त्याला शिकता येईल. विद्याथ्र्याच्या विश्लेषणात्मकतेला वाव मिळणार आहे. या धोरणामुळे विद्यापीठांची तीन प्रकारात वर्गवारी होणार असून एक प्रकार बहुउददेशीय विद्याशाखीय संशोधन शिक्षणाचे विद्यापीठ, दुसरा प्रकार केवळ संशोधनाचे विद्यापीठ आणि तिसरा अध्ययन व अध्यापनाचे विद्यापीठ असे तीन प्रकार राहतील.

येत्या पंधरा वर्षात विद्यापीठाशी महाविद्यालये संलग्न करण्याची प्रथा बंद होऊन ही महाविद्यालये स्वायत्त (स्वनिर्भर) करण्यावर भर दिला जाणार आहे. अडचणीमुळे विद्यार्थी प्रथम वर्षाचे शिक्षण सोडून गेला तरी त्याचे क्रेडीट जमा होतील आणि खंडानंतर तो पुन्हा शिक्षण घेऊ लागला तर पूर्वीचे क्रेडीट त्याला प्राप्त होतील. सध्याच्या विविध शिखर परिषदांऐवजी एकच स्टँडर्ड सेटींग काऊन्सिल तयार होईल. तसेच निधी देण्यासाठी देखील एकच संस्था अस्तित्वात येईल.

खाजगी आणि सार्वजनिक शिक्षण संस्थांना या धोरणात एकसारखे मोजले जाणार आहे. असेही सांगतांना प्रा.कुलकर्णी यांनी या धोरणात व्यापक विचार केला गेला असल्याचे नमूद केले. बहिणाबार्इंचा गौरव करतांना त्यांच्या कवितांमधील जीवनाच्या वास्तविकतेचा विचार प्रभावीपणे मांडला गेला असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला दिले गेल्याचा मनस्वी आनंद असल्याचे सांगून हा नामविस्तार इथल्या खेडयापाडयातील युवक युवतींशी अतूटपणे जोडला गेला आहे. बहिणाबार्इंच्या कर्तबगारीची विचारधारा घेऊन विद्यापीठाची वाटचाल सुरु असल्याचे नमूद केले. कोरोनाच्या या काळात बहिणाबार्इंचे जगण्याचे तंत्रज्ञान मानसिक बळ देण्यासाठी उपयोगी असल्याचेही ते म्हणाले.

प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाच्या रचनात्मक कामांचा तसेच भविष्यातील योजनांचा आढावा घेतला. प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी गेल्या वर्षभरातील विद्यापीठातील घडामोडींचा लेखाजोखा मांडला. जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी आभार मानले. या ऑनलाईन व्याख्यानाचा शिक्षणक्षेत्रातील धुरीणांनी लाभ घेतला.

Protected Content