नवीन विद्युत मिटर बसवण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यांना धक्काबुक्की!

 

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी ।  नवीन विद्युत मिटर बसवनाऱ्या कर्मचार्यांना  ग्राहकांनी विरोध करून हुज्जत घातली. वरिष्ठ तंत्रज्ञाच्या हातातून मोबाईल हिसकावून  आपटून नुकसान केले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने ग्राहक विरूद्ध शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

रामकृष्ण पाटील (रा. टाकळी प्र.चा) ह्या ग्राहकांच्या घरी विद्युत मिटर टॅम्पर असल्याचा संशय कक्षाचे सहायक अभियंता एस.एम.सरताळे यांना आला. त्यांनी वरिष्ठ तंत्रज्ञ प्रमोद शेंडे यांना मिटर तपासणीचे आदेश दिले. प्रमोद  शेंडे यांनी सहकारी बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ नितीन जाधव यांना सोबत घेऊन रामकृष्ण  पाटील यांची भेट घेऊन विद्युत मिटर तपासणी करीता एम.आय.डी.सी. खडकी येथे हजर राहण्याची विनंती केली त्यावर  माझे मिटर तुम्ही तपासून घ्या. येणारा अहवाल मला मान्य असेल असे ग्राहकाने सांगितले. त्यामुळे प्रमोद शेंडे यांनी विद्युत मिटर त्यांच्या पश्चात अॅक्युचेक मिटरवर प्रतिनिधी समक्ष तपासणी केली असता मिरटरच्या पाठीमागून होल पाडून वायर कट करून मिटर बंद करण्यात आल्याचे दिसून आले. तसा अहवाल ४ फेब्रुवारी रोजी प्राप्त झाल्याने सहायक अभियंता एस.एम.सरताळे यांनी नविन विद्युत मिटर बसवण्याचे आदेश दिले.

 

त्यानुसार प्रमोद  शेंडे व नितीन जाधव हे मिटर बसवण्यासाठी रामकृष्ण पाटील यांच्या घरी गेले असता त्यांनी मिटर बसविण्यास विरोध दर्शविला.कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करू लागला. प्रमोद शेंडेच्या डाव्या कानाला मारून हातातला मोबाइल हिसकावून जमीनीवर आपटून नुकसान केला. नितीन जाधव हे सोडवायला आले असता त्यांनाही हुज्जत घालत लोटालाटी केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे रामकृष्ण पाटील यांच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. प्रमोद शेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content