जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकाजवळ आपापसातील वादातून तिघांनी तालुक्यातील मोहाडी येथील रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून खिश्यातील मोबाईल आणि रोकड लंपास केली. यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर गुरूवारी १० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, महेंद्र पितांबर ठाकरे (वय-४०) रा. दत्त मंदिराजवळ मोहाडी ता.जि.जळगाव हे प्रवाशी रिक्षा चालविण्याचे काम करतात. १ डिसेंबर २०२० रोजी शहरातील नवीन बसस्थानकाजवळ त्यांच्या चुलत बहिणीला आपापसातील वादातून शिवा देविदास बाविस्कर रा. नागझिरा ता.जि.जळगाव याने शिवीगाळ केली. यावेळी बहिणीला शिवीगाळ का करतो असा जाब रिक्षा चालक महेंद्र ठाकरे यांनी विचारले असता राग असल्याने शिवा देविदास बाविस्कर, ज्ञानेश्वर देविदास बाविस्कर, कुंदन देविदास बाविस्कर तिघे रा. नागझिरा ता.जि.जळगाव यांनी महेंद्र ठाकरे यांना लाठ्या काठ्यांनी भरस्त्यावर बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचार घेतल्यानंतर त्यांनी गुरूवार १० डिसेंबर रोजी दुपारी शहर पोलीस ठाणे गाठून सर्व हकीकत सांगितली. याप्रकरणी महेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.