नकाशा वाचनासोबत भूगोल विषयाचा अभ्यास करावा : प्रा. प्रिती तारकस – जडिये

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | भुसावळ परिवर्तन मंच आयोजित मिशन एमपीएससीचे व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प द युनिक अकॅडमीच्या प्रिती तारकस – जडिये यांनी ऑनलाईन गुंफले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, कंबाईन पूर्व व मुख्य परीक्षेतील भूगोल विषयाच्या अभ्यास तंत्रावर त्यांनी मार्गदर्शन केले. 

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्यांनी, “राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जवळपास सोळा ते सतरा प्रश्न विचारले जातात. त्यात जागतिक भूगोलावर दोन ते तीन प्रश्न, भारताचा भूगोलावर सहा ते सात आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर आठ ते नऊ प्रश्न येतात. राज्यसेवा मुख्य परीक्षेत भूगोलावर जवळपास ९१ ते ९३ प्रश्न येतात. जगाच्या आणि भारताचा भूगोल अभ्यासण्यासाठी एनसीईआरटीची अकरावी आणि बारावीची पुस्तके वाचावीत. प्रामुख्याने यासोबतच बालभारतीची दहावी ते बारावीची भूगोलाची पुस्तके वाचावीत. महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासण्यासाठी बालभारतीचे चौथीचे पुस्तक व ए. बी. सौदी यांचे महाराष्ट्राचा भूगोल ही पुस्तके वाचावीत. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये मागील तीन परिक्षांपासून संकल्पनाधिष्ठित प्रश्न विचारले जात आहेत. भूगोल विषयातील चालू घडामोडी अभ्यासण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य मासिक वाचावे. संयुक्त पूर्व परीक्षेत भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोल यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. यामध्ये महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर प्रश्न येतात.”

प्रा. प्रीती तारकस-जडिये यांनी आपल्या व्याख्यानातून सोप्या पद्धतीने भूगोल विषयाचा अभ्यास करण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना दिले. भूगोलाचा अभ्यास करताना सोबतीला नाकाशवाचन केल्यास अभ्यास अधिक सोपा होतो. असा सल्ला त्यांनी दिला. भुसावळ परिवर्तन मंचाच्या या प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले. व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरांत विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान केले. आभासी पद्धतीने झालेल्या या व्याख्यानाचा लाभ भुसावळ शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घेतला.

व्याख्यानाची तांत्रिक बाजू प्रा. सुचित्रा लोंढे यांनी सांभाळली तर प्रास्ताविक व सूत्र संचालन डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ सचिन कुंभार, अक्षय ठाकूर, मंगेश भावे यांच्या सह भुसावळ परिवर्तन मंच सदस्यांनी सहकार्य केले. दि. १५ जुलै रोजी विज्ञान विषयावर प्रा. जयदीप पाटील यांचे व्याख्यान सायंकाळी सहा वाजता होणार आहे असे आयोजकांतर्फे कळविण्यात येत आहे.

Protected Content