नकाशा न लावता पाकचा बैठकीत सहभाग

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । कोरोना संकटामुळे बहुतेक बड्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या बैठका या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत. दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेतील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची गुरुवारी बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भाग घेतला. यावेळी बैठकीत पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचा नकाशा पाठिमागे लावलेला नाही. गेल्या बैठकीत भारताने नकाशावरून तीव्र विरोध दर्शवून बैठक सोडली होती.

कोरोना संकटादरम्यान सार्क देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची गुरुवारी बैठक झाली. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही या बैठकीत भाग घेतला. त्याचवेळी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हेदेखील पाकिस्तानमधून बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तानने कोणताही नकाशा पाठिमागे लावला नाही. या बैठकीत भारताने पाकिस्तानकडून होत असलेल्या सीमापार दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. सीमेपलिकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी हे सार्क देशांसमोरील मोठ्या आव्हानांपैकी एक आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे, असं एस. जयशंकर म्हणाले. जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानला लक्ष्य केलं.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची १६ सप्टेंबरला बैठक झाली होती. या बैठकीत पाकिस्तानच्या प्रतिनिधीच्या पाठिमागे एक नकाशा लावण्यात आला होता. या नकाशात भारतीय भूभागावर दावा करत तो पाकिस्तानने तो आपला असल्याचं दर्शवण्यात आलं होतं. भारताने पाकिस्तानच्या या कृतीचा कडाडून विरोध केला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी पाकिस्तानचा निषेध करत संतापून बैठक सोडली होती.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या संपूर्ण वादावर एक निवेदन जारी केलं होतं. रशियाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पाकिस्तानी सुरक्षा सल्लागाराने हेतुपुरस्सर हा काल्पनिक नकाशा सादर केला. हा नकाशा काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अधिकृतपणे जाहीर केला होता. यजमान देशाने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष आणि एससीओ नियमांचे हे उघड उल्लंघन आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले.

भारताने यजमान रशियाशी सल्लामसलत करून त्याचवेळी बैठक सोडली. ही एक व्हर्च्युअल बैठक होती. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत पाकिस्तानने भ्रामक विचार मांडले, असं अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं.

Protected Content