नंदुरबार प्रतिनिधी । ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे येथील जुन्या पोलिस कवायत मैदानात सोमवारपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी विद्यालयातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी व उपनगराध्यक्ष परवेज खान उपस्थित होते. दिंडीत विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. के. डी. गावित सैनिक शाळातील विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. ग्रंथोत्सवाच्या उदघाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. विजयकुमार गावित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अॅड. के.सी. पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, उपनगराध्यक्ष परवेज खान, माजी उपनगराध्यक्षा शोभा मोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पीतांबर सरोदे, नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, जिल्हा शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, रमाकांत पाटील, सूर्यभान राजपूत, योगेंद्र दोरकर, राजेंद्र गावित, साहित्यिक निंबाजी बागुल, नगरसेवक कुणाल वसावे, रवींद्र पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव उपस्थित होते.
आपल्या मनोगतातून आमदार अॅड. के. सी. पाडवी म्हणाले की, वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी तरुणांना प्रयत्न करावे लागतील. तरुणांनी सोशल मीडियावर आलेल्या प्रत्येक संदेशाची तपासणी करावी. त्याचबरोबर मजकूर फॉरवर्ड करताना त्याची सत्यता पडताळून पाहावी. आमदार डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, विद्यार्थ्यांचा प्रथम गुरू हा ग्रंथच असतो. विद्यार्थ्यांनी जीवनात ग्रंथाला सर्वोच्च स्थान दिले पाहिजे. कारण ग्रंथ वाचल्यामुळे ज्ञानात भर पडते. जीवन भयमुक्त होते. जीवनाची यशस्वितेकडे वाटचाल ग्रंथामुळे होते.