जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे जाण्यासाठी निघालेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील माहिजी ते म्हसावद रेल्वे दरम्यान रविवारी २ जुलै रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज सुपडू मानकर (वय-५८) रा. भोईटे नगर, जळगाव असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मनोज मानकर हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह शहरातील भोईटे नगर परिसरात वास्तव्याला आहे. कुरीअरचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. रविवार २ जुलै रोजी सायंकाळी ते नाशिक येथे कामाच्या निमित्ताने जाण्यासाठी निघाले होते. जळगाव तालुक्यातील माहेजी आणि म्हसावद रेल्वे स्थानक दरम्यान धावत्या रेल्वेतून मनोज मानकर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही बाब जळगाव रेल्वे स्टेशन उपप्रबंधक यांना मिळाली. त्यानुसार जळगाव रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला.याठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा दिग्विजय, मुलगी गुंजन असा परिवार आहे.