धार्मिक : सत्पंथा मार्फत वारकरी कथा कीर्तनाचे आयोजन

फैजपूर, प्रतिनिधी | सांप्रदायिक समन्वय निर्माण व्हावा व सनातन संस्कृती बळकट व्हावी या उदात्त हेतूने फैजपूर येथील महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी जी महाराज यांचे प्रेरणेतून श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सतपंथ संप्रदायामार्फत श्रीमद् भागवत कथा व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. एका संप्रदायाने दुसर्‍या संप्रदायाचे याप्रमाणे आयोजन करणे हे या कार्यक्रमाचे विशेष आहे.

 

श्री क्षेत्र मुक्ताईनगर कोथळी जुने मंदिरात हे भव्य आयोजन होत असून हभप श्री रविंद्र महाराज हरणे, श्री हभप उद्धव महाराज जुनारे व संस्थाध्यक्ष ॲड. रवींद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहभर दैनंदिन वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दि. २१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या विशेष कार्यक्रमात दररोज सकाळी पाच ते सहा वाजता काकड आरती, आठ ते दहा वाजता नामजप, दुपारी बारा ते चार वाजता आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (श्रीक्षेत्र नवगण राजुरी, जि. बीड) यांच्या श्रवणीय वाणीतुन श्रीमद् भागवत कथेचे वाचन संपन्न होणार आहे.

तर दररोज रात्री साडेसात ते साडेनऊ यादरम्यान वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन होणार आहे. यात दि. २१ नोव्हेंबर रोजी श्री हभप निष्ठावंत वारकरी परमेश्वर महाराज गोंडखेल जामनेर, दि. २२ रोजी श्री हभप बाळकृष्ण महाराज (दादा) वसंतगडकर ता. कराड, जि. सातारा, दि. २३ श्री हभप ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी कर ता. चाळीसगाव, दि. २४ श्री हभप भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ (श्री ज्ञानेश आश्रम) वारी भैरवगड, दि. २५ रोजी श्री हभप रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर खामगाव, दि. २६ रोजी श्री हभप कान्होबाराय महाराज देहूकर (श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज), तसेच दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ ते दहा वाजता श्री हभप वारकरी भूषण रविंद्र महाराज हरणे (श्री मुक्ताई संस्थान) मुक्ताईनगर यांचे सुश्राव्य काल्याचे किर्तन होणार आहे.

या कीर्तनानंतर लगेच दहा ते बारा या वेळेत संत संमेलनाचे आयोजनही करण्यात आले आहे. हा सर्व कार्यक्रम सनातन सतपंथ संप्रदायद्वारा आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमाला महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज फैजपूर यांच्या विशेष उपस्थितीसह पूजनीय संत महात्मा, कीर्तनकार, टाळकरी, वारकरी, लोकप्रतिनिधी, धर्मप्रेमी भाविक उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन आयोजक सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे.

Protected Content