नाशिक, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही, धार्मिक तेढ निर्माणाचा प्रयत्न केल्यास थेट चार महिने तुरुंगवास शिक्षा, असा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिला आहे.
भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा लावू, या राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंग्यांसंदर्भात निर्देशच जारी केले आहेत.
मशिदीपासून १०० मीटरच्या आत पाच वेळेच्या नमाजाच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. हनुमान चालीसा म्हणावयाचे असले त्याने शंभर मीटर दूर अंतरावर म्हणायचं असेल त्यांनी ३ मे पर्यंत परवानगी घ्यावी. सोबतच ध्वनी प्रदूषणाविषयी नियमाचे पालन करून हनुमान चालीसा किंवा नमाज पठण करावे लागणार आहे. हनुमान चालीसा, भजन यावर बंदी घालण्यात आलेली नाही. अजानची वेळ सोडून परवानगी घेऊन मंदिरात किंवा घरात हनुमान चालीसा लावत असतील तर प्रशासनाला काहीही आपत्ती नसल्याचे नाशिक पोलीस आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै २००५ रोजी दिलेला आदेश आणि राज्य शासनाचे वेळोवेळीचे निर्णय आणि विशेष शाखेचा गोपनिय अहवाल लक्षात घेता, ज्या मशिदीच्या १०० मीटरच्या आत तसेच पाच वेळांच्या आधी किंवा नंतर १५ मिनाटांच्या कालावधीत भजन करुन, हनुमान चालीसा वाजवून किंवा दुसरे वाद्य वाजवण्यावर बंदी घालण्यात आली असून भोंगे लावण्याच्या नावाखाली कोणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना थेट चार महिने तुरुंगवासाची शिक्षा याशिवाय शहरातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात येणार आहे, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ४० अंतर्गत हे आदेश काढण्यात आले असून पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सामाजिक तेढ निर्माण होण्याची, धार्मिक भावना दुखवण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी जे कोणी पक्षकार, सामन्य जनता किंवा इतर जे घटक आहेत त्यांच्यासाठी आदेश पारित करण्याचे अधिकार पोलीस आयुक्तांना असल्याचेही आयुक्त पांडेय यांनी यात म्हटले आहे.
प्रत्येक धार्मिक स्थळाला एका वर्गीकरणानुसार औद्योगिक, व्पापारी, नागरी वस्ती आणि सायलेंट झोन, यानुसार दिवसपाळी आणि रात्रपाळीचे निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. या सर्वासाठी १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन मे पर्यंत मूभा देण्यात आलीय. तीन मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळं, ज्यामध्ये मंदिर, मशिदी, गुरुद्वारा वर अन्य धार्मिक स्थळांना भोंग्यांची परवानगी घ्यावी लागेल. ३ मे नंतर आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय भोंगे वाजवल्यास भोंगे जप्त करण्यात येतील. तसेच त्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केला जाईल. त्यानंतर जे काही गैरकायदेशीर भोंगे आहेत ते जप्त करण्यात आले असून त्यापूर्वी खबरदारी म्हणून धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून अजानच्या वेळेत बंदीचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही आयुक्त दीपक पांडेय यांनी म्हटले आहे.