फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी) । धाडी व मोर नदीतून गौणखनिजाची वाहतूक होत असल्याने प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या आदेशान्वये दोन्ही नदी पात्रातील रस्ते जेसीबीच्या मदतीने रस्ता बंद करण्यात आला. अशी माहिती मंडळाधिकारी जे.डी. बंगाळे यांनी दिली.
गेल्यावर्षी लोकसहभागातून स्वर्गीय हरिभाऊ जावळे व परम पूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या पुढाकाराने संत-महंत, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या सहभागातून यावल रावेर तालुक्यात ठीकठिकाणी जलक्रांती अभियानातून बंधारे बांधण्यात आली. यात लाखो लिटर पाणी अडविण्यात आले. असाच एक बंधारा फैजपूर येथील वॉटर फिल्टर हाऊसच्या पाठीमागे रोझोदा मधला रस्ता या ठिकाणी लोकसहभागातून करण्यात आलेल्या या कामाच्या बंधार्याची शेकडो ब्रास वाळू, माती रातोरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने बिनबोभाट वाहून नेली जात आहे.
दोन-तीन दिवसापासून हा प्रकार सुरू होता याची फैजपूर शहरात चर्चा सुरू होती. याविषयी फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी गांभीर्याने दखल घेत फैजपूर मंडळाधिकारी जे.डी.बंगाळे यांना आदेश देऊन धाडी नदी व मोर नदी पात्रात ज्या रस्त्याच्या वापर करून गौणखनिज वाहतूक करणारे वाहने माती वाहतूकीसाठी जातात अश्या ठिकाणी रस्ता बंद करण्याचे आदेश दिल्याने आज बुधवारी धाडी नदी व मोर नदी या दोन्ही नदी पात्रात यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साह्याने ज्या रस्त्याच्या वापर करून गौणखनिज वाहतूक करणारे वाहने माती वाहतूकीसाठी वापर करतात या रस्त्यांवर आडवे खोल चर खोदून सदरचे रस्ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांवर निर्बंध बसण्यास मदत होईल.