धरणगावात सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त प्रबोधन शिबिर संपन्न

धरणगाव प्रतिनिधी |  येथील मोठा माळी वाडा समाज मढीमध्ये १४८ व्या “सत्यशोधक समाज वर्धापनदिनानिमित्त प्रबोधन शिबिर” उत्साहात पार पडले.

प्रबोधन शिबिराचे प्रास्ताविक माळी समाजाचे पंच हेमंत ज्ञानेश्वर माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप महामंडलेश्वर भगवानजी बाबा होते. या प्रबोधन शिबिराचे उद्घाटन संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रबोधन शिबिराचे प्रमुख वक्ते औरंगाबादचे सत्यशोधक अरविंद खैरनार, धुळे येथील सत्यशोधक डॉ. सुरेश झाल्टे, अमळनेर येथील सत्यशोधक विश्वासराव पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव येथील सत्यशोधक भगवान रोकडे व कैलास जाधव यांची विशेष उपस्थित होती.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर धरणगावातील युवकांच्या हस्ते खंडेरायाची तळी भरून प्रबोधन शिबिराला सुरुवात करण्यात आली. आलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचे माळी समाज पंच मंडळाच्या वतीने ग्रंथ देऊन स्वागत सन्मान करण्यात आले.

शिबिराचे प्रमुख वक्ते अरविंद खैरनार यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा जीवनपट सांगून महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करून आपल्या महापुरुषांचे शिक्षण दिले पाहिजे, आपले सत्यशोधक विधी आपल्याच माणसाने करावे असे प्रतिपादन केले.

प्रबोधन शिबिराचे दुसरे वक्ते डॉ. सुरेश झाल्टे यांनी तात्यासाहेबांचा सत्यशोधक संस्कार अंगीकारला पाहिजे, इतिहासातले विविध उदाहरण दाखले देऊन युवकांना मंत्रमुग्ध केले. आपणच आपल्या लोकांसाठी पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, आपल्याच लोकांच्या हातून सत्यशोधक विधी झाले पाहिजे, आपली वास्तुशांती, आपला विवाह सोहळा, आपले दशक्रिया विधी आपणच केले पाहिजे असे प्रतिपादन करून खंडेरावच आपले मूळ दैवत आहे असे उदाहरणासह स्पष्ट केले.

सत्यशोधक विश्वासराव पाटील यांनी महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. वारकरी संप्रदायाची पताका पूर्ण देशभरात रोवणारे संतश्रेष्ठ नामदेव महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज व संत शिरोमणी सावता महाराज यांचे वास्तव – उदाहरण देऊन श्रोत्यांसमोर ठेवले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडलेश्वर भगवान बाबा यांनी मला आज सत्यशोधक चळवळ कळाली व खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक चळवळ पुनरुज्जीवित झाली पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रबोधन शिबिराच्या शेवटी सत्यशोधक कार्यकारणी मंडळ घोषित करण्यात आली.

याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, सचिव गोपाल माळी, डिगंबर महाजन, ज्येष्ठ सदस्य सुखदेव महाजन, दशरथ बापू महाजन, लोकनायक न्यूजचे संपादक, सत्यशोधक – जितेंद्र महाजन, कैलास पवार, सुधाकर मोरे, आकाश बिवाल, गोरख देशमुख, निलेश पवार, गौतम गजरे, जयेश महाजन, रामचंद्र माळी, कन्हैया महाजन, निवृत्ती माळी, शुभम माळी, विकास माळी, किरण महाजन, भावेश महाजन, लोकेश महाजन, समाधान महाजन, हर्षल गजरे, दिगंबर माळी, राहुल खैरनार, प्रल्हाद महाजन दिनेश महाजन, राहुल माळी, दीपक पाटील, दिपक मराठे, महादू अहिरे, श्रीराम माळी, योगेश तायडे, प्रकाश महाजन, कैलास माळी, विजय सोनवणे, भरत शिरसाठ, सुनील लोहार, महेंद्र तायडे, ललित मराठे, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, भरत मराठे, किशोर पवार, लक्ष्मणराव पाटील, आबासाहेब राजेंद्र वाघ व आदी बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रबोधन शिबिराचे सूत्रसंचालन माळी समाजाचे पंच पी डी पाटील यांनी तर आभार सचिव गोपाल भास्कर माळी यांनी मानले. प्रबोधन शिबिर यशस्वीतेसाठी माळी समाज पंच मंडळाने परिश्रम घेतले.

Protected Content