धरणगाव प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात एक गरोदर महिला वेदनेने कळवळत असतांना तिला जळगावला जाण्यासाठी रूग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करण्याचा गंभीर प्रकार धरणगावच्या ग्रामीण रूग्णालयात घडला आहे.
याबाबत वृत्त असे की, शिवसेनेतर्फे नुकतीच धरणगाव ग्रामीण रूग्णालयात रूग्णवाहिका भेट म्हणून देण्यात आलेली आहे. याचा उपयोग तालुक्यातील जनतेला होणार असल्याचे मानले जात होते.तथापि, ग्रामीण रूग्णालयातील यंत्रणा खूप ढिम्म असल्याचा अनुभव अवघ्या काही दिवसांमध्येच आलेला आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील साळवा येथील एक गरोदर महिला ग्रामीण रूग्णालयात आली. तिला गावातील आशा स्वयंसेविका धरणगावातील रूग्णालयात घेऊन आली. तेथे त्या महिलेस दाखल करून न घेता जळगाव येथील रूग्णालयात पाठविण्याचा सल्ला ग्रामीण रूग्णालयातून देण्यात आला. याप्रसंगी संबंधीत महिलेस रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची विनंती आशा स्वयंसेविकेने केली. यावर ग्रामीण रूग्णालयात नकार देण्यात आला. रूग्णालयाची नसेल तर १०८ क्रमांकावर कॉल करून रूग्णवाहिका उपलब्ध करण्याची मागणी देखील विचारात घेण्यात आली नाही. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत ही महिला धरणगाव रूग्णालयातच वेदनेने कळवळत होती.
दरम्यान, ग्रामीण रूग्णालयाच्या या भोंगळ काराभारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेहमी उदोउदो करून घेणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांची या प्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००