धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | उधारीने दिलेले ५० रूपये घेण्याच्या वादातून पुतण्याने धक्का देवून गटारीत पडलेल्या काकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कंडारी येथे घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत सुकडू भिल (वय ४४) असे मयताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजुने आपले काका भारत यांना जोराचा धक्का दिला. यात ते भरत भील हे बाजूला असलेल्या गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तस्त्राव झाला. यानंतर भेदरलेल्या पुतण्या राजूने त्यांना लागलीच नातेवाईकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती भारत भिल यांना मृत घोषित केले. यासंदर्भात पुतण्या राजू भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करीत आहे.