धरणगावात कोरोनाचा दुसरा बळी; पॉझिटीव्ह महिलेचा मृत्यू

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील खत्री गल्ली परिसरातील कोरोना पॉझिटीव्ह महिलेचा उपचार सुरू असतांना रात्री मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सपोनि पवन देसले यांनी मृत महिलेच्या आप्तांची समजूत काढून तिचा अंत्यविधी जळगावातच करण्याची व्यवस्था केली आहे.

धरणगावात आधी कोरोनाचा संसर्ग नव्हता. तथापि, अलीकडच्या काळात शहरातील रूग्णांची संख्या झपाट्याने वाढून दहावर गेली. यात आधी एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पहाटे तीनच्या सुमारास दुसर्‍या पॉझिटीव्ह महिलेचा कोविड रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे. ही महिला खत्री गल्ली परिसरातील रहिवासी होती. यामुळे आता शहरातील कोरोनाग्रस्तांच्या बळीचा आकडा दोनवर गेला आहे. शहरात एकूण दहा पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून यातील सहा रूग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आलेला आहे. यामुळे आता शहरात दोन कोरोना पॉझिटीव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृत महिलेच्या आप्तांनी संंबधीत महिलेचा अंत्यसंस्कार धरणगाव येथे करण्याचे नियोजन केले होते. तथापि, धरणगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पवन देसले यांनी त्यांची समजूत काढून जळगाव येथील नेरी नाका स्मशानभूमितच त्यांचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली आहे. या अनुषंगाने या महिलेच्या पार्थिवावर जळगावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Protected Content