धरणगावातील एका मयताचा स्वॅब पाठवला ; संपर्कातील दोघांना केले क्वारंटाईन

धरणगाव (प्रतिनिधी) आज शहरातील पारधीवाडा परिसरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मयताचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे. तसेच मयत व्यक्तीच्या संपर्कातील दोन जणांना क्वारंटाईन केले असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी दिली आहे.

 

शहरातील पारधी वाडा भागात एका मयत व्यक्तीचा स्वॅब घेण्यात आला आहे. तसेच अहवाल येत नाही तोपर्यंत प्रशासनाने सतर्कता म्हणून त्याच्या संपर्कातील दोन जणांना क्वारंटाईन केले आहे. दरम्यान, संबंधित परिसराची पाहणी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, प्रांतधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड, मुख्याधिकारी जनार्धन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले, नगरसेवक अजय चव्हाण, शरद करमाळकर आदींनी केली. यावेळी संबंधित प्रभागात पालिकेने फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करून घेतला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी जोपर्यंत अहवाल येत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनच्या नियमांचे सक्त पालन करावे,असे आवाहन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे. तसेच शहरातील तरुणांनी प्रशासनाच्या मदतीसाठी पुढे यावे अशी विनंती देखील केली आहे.

Protected Content