चाळीसगावात दिवसाला केवळ दहा वाहने कापूस खरेदी ; शेतकरी नाराज

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकऱ्यांची अत्यंत गरजेची मागणी असलेल्या कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून यश येऊन कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी देखील करण्यात आली. याची प्रत्यक्ष कापूस खरेदी आज शनिवार १६ मे पासून सुरु झाली असून केवळ १० वाहनांतील कापूस खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे.

कापूस खरेदी ऑनलाइन प्रक्रियेत तालुक्यातील जवळपास ३००० इतक्या शेतकऱ्यांनी आपल्या कापसाची नोंदणी दिनांक ११ ते १५ मे या कालावधीत केली आहे. मात्र एका दिवसात फक्त दहा वाहने कपाशीची खरेदी या केंद्रावर होत असल्याने ३००० कपाशी विक्रेत्या शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीस मोठा विलंब होणार आहे सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्यांना आपला कापूस विकून पुढील हंगामासाठी बी-बियाणे खते खरेदी करण्याकरिता पैशांची आवश्यकता असणार आहे. यासाठी कापूस खरेदी केंद्र जास्त प्रमाणात कापसाच्या वाहनांची मोजणी होऊन खरेदी व्हावी अशी मागणी होत आहे. या संदर्भात तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी लाईव्ह ट्रेन न्युज ने संपर्क केला असता शेतकऱ्यांचा कापूस जास्तीत जास्त प्रमाणात दररोज खरेदी व्हावा यासाठी मी प्रयत्नशील असून कापूस खरेदी केंद्रावर जास्त कर्मचाऱ्यांची उपलब्धता करण्यासंदर्भात संबंधित ग्रेडर व अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली आहे. लवकरच जास्त वाहने खरेदी करण्यास सुरुवात होईल असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. दर दिवशी १०० वाहने खरेदी व्हावेत अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरळीत झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे

Protected Content