जळगाव प्रतिनिधी । आपल्या घराच्या परिसरातील रहिवाशांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देणार्या पोलीस कर्मचारी असणार्या महिलेला अखेर निलंबीत करण्यात आले आहे.
जुना खेडी रोड येथील रहिवासी महिला पोलिस कर्मचारी कल्पना प्रभाकर जाधव या तालुका पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. नेमणुकीस असताना ड्यूटीवर गैरहजर राहणे, कर्तव्यास नकार देणे अशा किरकोळ तक्रारी त्याच्या विरुद्ध होत्या. मात्र, त्या वास्तव्यास असलेल्या पंडित प्लाझा अपार्टमेंट मधील सर्वच्या सर्व कुटुंबीय त्रासले होते. शेजार्यांच्या घरात कचरा फेकणे, कुत्र्याची विष्ठा टाकण्या पासून वादाला सुरवात होऊन पुरुषांवर छेडखानीचे आरोपही लावण्यात येत होते. या प्रकरणी रहिवाशांकडून वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही, पोलिस असल्याचा सामान्यांना उपद्रव सहन करावा लागतो म्हणून या सर्व प्रकरणाच्या वरिष्ठांना तक्रारी करण्यात आल्या होत्या. नियुक्त पोलिस ठाण्यात कर्तव्यावर गैर हजर राहण्यासह सहकार्यांना आणि पोलिस अधिकार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या देणे, आरडा ओरड करण्याच्याही तक्रारी होत्या. अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्याकडे या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू होती. चौकशी अंती बेशिस्त पोलिस खात्याची जनमानसात प्रतिमा मलिन होईल असे वर्तन केल्याचे आढळून आल्याने पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कल्पना जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
दरम्यान, निलंबनाची नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या दोन पोलिस कर्मचार्यांशी सुध्दा या महिला कर्मचार्याने हुज्जत घातली. नोटीस घेण्यास नकार देत वाद घातल्याने पोलिसांनी ही नोटीस दारावर डकवून रीतसर त्याचा पंचनामा करण्यात आला आहे.