धमकी देऊ नका , एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही; उद्धव ठाकरेंचा इशारा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । धमकी देऊ नका , एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही , असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या विधानाच्या संदर्भाने दिला आहे

 

भाजपाचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचे राज्यात पडसाद उमटले. भाजपाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेना नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत टीकास्त्र डागलं. शिवसेना भवन फोडण्याच्या विधानाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. “आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ”, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

 

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचं बांधकाम केलं जाणार आहे. बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा दिला. “मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरूवात माझ्या हस्ते होईल, असं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. कार्यक्रमाला येत असताना रस्त्यांच्या दोन्ही बाजूनं लोक होती म्हणून मी गाडीतून उतरून चालत आलो. लोक फुलांची उधळण करीत होते, पण खरंतर या चाळीचे ऋण आमच्यावर आहेत. आता चाळीचं टॉवर करतोय, पण त्यांनी आपल्याला जे दिलं ते ऋण आपण फेडू शकत नाहीत. या चाळीच्या इतिहासाची मूळं खोलवर रुजलेली आहेत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असं टिळक म्हणाले, पण त्या स्वराज्यात हक्काचं घरं असायला हवं. तेच आम्ही करतोय”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजकीय टोलेबाजीही केली. “सतेज पाटीलजी, डबल सीट म्हणाले. पण आपलं सरकार ट्रिपल सीट आहे. हे मुद्दामहून बोलतोय. कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केलं की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी कुणी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्या गुण आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विधानाचा समाचार घेतला.

 

Protected Content