धनोत्रयोदशीला २० हजार कोटींची सोने विक्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । यंदा धनोत्रयोदशीला मागच्यावर्षीच्या तुलनेत ३० टक्के जास्त सोन्याची विक्री झाली. ग्राहकांनी यंदा २० हजार कोटीपर्यंत सोन्यांची खरेदी केली अशी माहिती आयबीजेए या ज्वेलर्सच्या संघटनेने दिली. यंदा धनोत्रयोदशीला देशभरात ४० टन सोन्याची विक्री झाली. त्याची किंमत २० हजार कोटी आहे.

मागच्यावर्षी देशभरात १२ हजार कोटी रुपयाच्या सोन्याची विक्री झाली होती. यंदा हाच आकडा २० हजार कोटींच्या घरात आहे अशी माहिती IBJA चे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र मेहता यांनी दिली. “मागच्यावर्षी धनोत्रयोदशीला ३० टन सोन्याची विक्री झाली होती. यंदा ४० टन सोन्याची विक्री झाली” असे मेहता म्हणाले.

सोन्याची किंमत ७० टक्क्याने वाढली असे त्यांनी सांगितले. “मागच्या आठ महिन्यात लॉकडाऊनमुळे ग्राहकांना सोने खरेदी करता आली नव्हती, त्यामुळे यंदा खरेदीत वाढ झाली” असे मेहता म्हणाले. “आता लग्नाचा मोसम सुरु होईल. लोक इतके महिने थांबले होते. आता धनोत्रयोदशीच्या निमित्ताने लोकांनी सोन्या-चांदीची खरेदी केली” असे मेहता यांनी सांगितले. प्रतितोळा ५६ हजारापर्यंत पोहोचलेल्या सोन्याची किंमत आता थोडी कमी झाली आहे. शुक्रवारी प्रतितोळा १० ग्रॅम सोन्याची किंमत ५० हजारच्या पुढे होती.

Protected Content