मुंबई, वृत्तसेवा । सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचं समजतं.
धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचं दहा दिवसांपूर्वी समोर आलं होतं. त्यांच्या सोबतच त्यांचे दोन स्वीय सहायक, मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक यांचे कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आले होते. मुंडे यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. इतर कुठलीही लक्षणं त्यांच्यात दिसत नव्हती. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं समजतं.