लखनऊ (वृत्तसंस्था) गुंडाविरोधात कारवाई होत नसल्यामुळे अमेठी जिल्ह्यातील एक महिला आणि तिच्या मुलीने मुख्यमंत्री कार्यालयाच्या गेटजवळ आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे. सध्या या महिलेची स्थिती गंभीर आहे. या घटनेवरून विरोधकांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
अमेठीत एका नाल्याच्या विवादातून काही लोकांनी एका महिलेला जबरदस्ती मारहाण केली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्या लोकांनी पोलीस ठाण्याबाहेर पिडीत महिलेला मारहाण केली. या प्रकरणावर सुनावणी होत नसल्याने महिला आणि तिच्या मुलीने शुक्रवारी लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदतीसाठी पोहचली. मागील एक महिन्यापासून आई आणि मुलगी फेऱ्या घालत आहेत. त्यांची मंत्र्याची भेट झाली पण दोघींनीही लोकभवनच्या बाहेर येऊन स्वत:पेटवून घेतले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या दोन्ही महिलांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, महिलेने सांगितले की, आमच्या येथील नाल्याची तक्रार ऐकून घेतली जात नाही. आम्ही अनेकदा तक्रार केली. त्यानंतर सुनावणी होत नव्हती. काही गुंड आम्हाला धमक्या देऊ लागले. त्यांनी आम्हाला मारहाणही केली. असे असूनही कारवाई झाली नाही. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुंडाविरोधात कारवाई होत नसल्याने आई-मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला, हा प्रकार दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.