धक्कादायक…खडसेंचाही फोन झाला होता टॅप : इंग्रजी वर्तमानपत्राच्या दाव्याने खळबळ

eknath khadse

मुंबई प्रतिनिधी । फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप झाल्या प्रकरणी चौकशी सुरू असतांना आता एका इंग्रजी वर्तमानपत्राने भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप झाला असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे आरोप अलीकडेच करण्यात आले असून या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्राने विरोधी पक्षांचे नेतेच नव्हे तर भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप करण्यात आला होता असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या वृत्तात असे म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतांना राज्य सरकारमधील एक आयपीएस अधिकारी हा इस्त्राएलच्या दौर्‍यावर गेला होता. या दौर्‍यात पेगॅसस सॉफ्टवेअरची खरेदी करण्यात आली होती. या सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हाटसअ‍ॅपचे मॅसेज आणि कॉलींगवर नजर ठेवता येत असल्याचे यानंतर सिध्द झालेले आहे. याच सॉफ्टवेअरच्या मदतीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांच्या फोनवर नजर ठेवण्यात आली होती. यातच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप करण्यात आला होता असा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीला सहा आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले असून यात खडसे यांच्या फोन टॅपींगची चौकशी देखील करण्यात येणार असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने एकनाथराव खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते दिल्ली येथे पक्षाच्या प्रचारात असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

Protected Content