धक्कादायक : कोरोना बाधित वृद्ध महिला कोविड रुग्णालयाच्या गेटवर पडून !

जळगाव (प्रतिनिधी) येथील कोविड-१९ रुग्णालयाच्या गेटवर चक्क एक कोरोना बाधित वृद्ध महिला पडून असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा कोविड-१९ रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. दरम्यान, या असंवेदनशील…अमानवीय घटनेच्या विरोधात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वी एरंडोल येथील वृद्ध महिलेचा मुलगा पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या वृद्ध महिलेला देखील जळगाव कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास अचानक या आजीबाई रुग्णालयाच्या गेटवर पडून असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या निदर्शनास आले. सामाजिक कार्यकर्त्याने वृद्ध महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी करून सर्व माहिती घेतली आणि त्यानंतर तो व्हिडीओ एरंडोल येथील काही मित्रांना पाठवून आजीची ओळख पटविण्याची विनंती करत नातेवाईकांना सूचना देण्याची विनंती केली. परंतू थोड्याच हा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर संबंधित वृद्ध महिलेचा कोरोना बाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर दुसरीकडे कोविड रुग्णालय प्रशासनाने संबंधित वृद्ध महिलेच्या केस पेपरवर बेपत्ता असल्याचा शेरा मारला होता. ज्या महिलेला जागेवरून उठता येत नव्हते, ती महिला स्वतःहून चालत गेटपर्यंत कशी आली? हा मोठा प्रश्न आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संबंधित कोरोना बाधित वृद्ध महिलेला पुन्हा कोरोना वार्डात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, एक कोरोना बाधित महिला अशा पद्धतीने गेटवर पडून असते, यावरून कोविड रुग्णालयात किती भोंगळ कारभार सुरु आहे, याची प्रचीती  येत आहे. दरम्यान, या व्हिडीओवरून रुग्णालय प्रशासानानाचे कोरोना वार्डाकडे सपशेल दुर्लक्ष असते, हे स्पष्ट झाले आहे. तर कोरोना बाधित रुग्ण अशा पद्धतीने बाहेर पडत आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

(‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’कडे हा व्हिडीओ उपलब्ध आहे. परंतू सामाजिक जाणीव लक्षात घेता त्याला प्रकाशित न करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.)

Protected Content