मुंबई : वृत्तसंस्था । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन गुन्ह्यात तपास करणाऱ्या एनआयएने अटकेतील पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या कटाचा उलगडा केला आहे. सचिन वाझे या गुन्ह्यात दोघांची हत्या करुन त्यांना यात गोवण्याची शक्यता होती.
सचिन वाझे यांच्या निवासस्थानी एक पासपोर्ट सापडला असून हा महत्वाचा पुरावा ठरु शकतो. एनआयए सध्या एन्काऊंटरचा काही प्लॅन होता का याची माहिती घेत आहे. सचिन वाझे यांनी आणखी एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट आखला होता. हत्येनंतर दोघांना गुंतवलं जाणार होतं.
२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडलं होतं. कटानुसार, एनआयएने ओळख उघड करण्यास नकार दिलेल्या त्या दोन व्यक्तींची त्याच दिवशी हत्या केली जाणार होती. नंतर सचिन वाझे उलगडा केल्याचं श्रेय घेणार होते. १७ मार्चला सचिन वाझेंच्या घरावर धाड टाकली असता हा पासपोर्ट मिळाला होता.
ते दोन व्यक्ती औरंगाबाद येथून चोरण्यात आलेली Maruti Eeco कार चालवणार होते आणि स्फोटकांसह अंबानींच्या घराबाहेर पार्क करणार होते. एनआयएने मिठी नदीतून गाडीची नंबरप्लेट मिळवली आहे. पण सचिन वाझे यांना नशिबाने साथ दिली नाही आणि ही योजना फसली. यानंतर त्यांनी बी प्लॅन वापरला ज्यामध्ये मनसुख हिरेन यांच्या मालकीचं वाहन तिथे पार्क करण्यात आलं.
मनसुख हिरेन यांच्या हत्येची माहितीही सचिन वाझे एटीएससमोर देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. सचिन वाझे एन्काऊंटर स्पेशलिस्ट असतानाही योजना अत्यंत वाईट पद्दतीने आखण्यात आल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. अद्यापही मनसुख हिरेन यांचा गळा नेमका कोणी दाबला हे स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान सचिन वाझे यांनी अटकेच्या एक दिवस आधी वापरलेला फोन अद्यापही तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. फोन हाती लागल्यास अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.