जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातून रस्त्यालगत बांधलेले दोन गाय आणि वासरु चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवार १८ ऑक्टोंबर रोजी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात कृष्ण कॉलनीत राजेंद्र देवाभाई भरवाड वय २८ हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मालकीच्या दोन गायी व एक वासरु त्यांनी नेहमीप्रमाणे ते राहत असलेल्या परिसरातच जिजाऊनगर भागात मोकळ्या जागेत बांधलेली होती. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दोन्ही गाय व वासरु दिसून आले नाही. सर्वत्र परिसरात शोध घेतला , यात एका वाहनातून अज्ञात व्यक्तींनी गुरे चोरुन नेल्याची माहिती मिळाली. यानंतर याबाबत राजेंद्र भरवाड यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन दोन गाय व एक वासरु असे १६ हजार रुपयांचे पशुधन चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिनेश पाटील हे करीत आहेत.