पहूर, ता.जामनेर रविंद्र लाठे । येथील एका महिलेचा कोविड रूग्णालयातील अहवाल निगेटीव्ह तर, जळगाव व औरंगाबाद येथील खासगी प्रयोगशाळेतील स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून तिच्यावर आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, यामुळे चाचणीच्या विश्वासार्हतेबाबत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्याचे अधोरेखीत झाले आहे.
याबाबत वृत्त असे की, पहूर येथील एका महिलेस दिनांक १५ जून रोजी खोकला व दम्याचा त्रास होत असल्याने त्यांना जामनेर येथील दवाखान्यात दाखविण्यात आले. तेथील तपासणीमध्ये संबंधीत रूग्णाच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी आल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. तथापि, खाजगी दवाखान्यात न घेतल्याने त्यांना जिल्हा कोवीड रूग्णालयात दाखल करण्यात आले. याच दिवशी म्हणजे १५ रोजी त्यांनी कोवीड सेंटर व जळगावातील खासगी लॅब येथे स्वॅब दिले. मात्र त्याच दिवशी तब्येत खालावल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. यात दि.१६ रोजी औरंगाबाद येथील खासगी लॅब मध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. तत्पूर्वी जळगावला कोवीड सेंटर येथे दिलेल्या स्वॅब चा अहवाल दि.१७ रोजी निगेटिव्ह आला. यानंतर दि.१८रोजी औरंगाबाद ला दिलेल्या स्वॅब चा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि जळगाव येथील खासगी लॅब चा अहवाल आज म्हणजे १९ जून रोजी पॉझीटिव्ह आला. यामुळे आता नेमका कुणाचा अहवाल खरा ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. परिणामी चाचणी अहवालाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, खासगी लॅबचा अहवाल ग्राह्य मानून संबंधीत महिलेवर कोरोनाचे उपचार सुरू करण्यात आले आहेत. या महिलेमुळे आता पहूर येथील कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण संख्या चार झाली आहे. यातील एक रूग्ण बरा झाला असून तीन उपचार घेत आहेत. दरम्यान, पहूर पेठ ग्रामपंचायती तर्फे महिला पॉझीटिव्ह आढळून आलेल्या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. नागरीकांनी आता तरी सावध व्हा ! असे कळकळीचे आवाहन प्रशासनाने केले आहे.