मुंबई, वृत्तसेवा । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे असून दोघांमध्ये जिव्हाळ्याचे नाते असल्याचे स्पष्ट केले. राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. ते प्रियच असतात. ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात दुरावा येण्याचा प्रश्नच नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या भेटीत १५ ते २० मिनिटे चर्चा झाल्याने भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी राऊत यांनी संवाद साधला. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचेही मधूर संबंध आहेत. दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही. आमच्यात दऱ्यावगैरे वाढत नाही, असं सांगतानाच राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. ते पालक असून घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे सर्वांना प्रियच असतात. पण विरोधक जेव्हा राजकारण करतात तेव्हा आम्ही भाष्य करत असतो, असा चिमटाही राऊत यांनी यावेळी काढला. मधल्या काळात मी देसभरातील घटनांविषयी मत व्यक्त केलं होतं. त्याचा मुंबईच्या राजभवनाशी संबंध जोडू नका, असंही ते म्हणाले.