नवी दिल्ली वृत्तसंस्था । मोटर वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाची आपत्ती आणि यामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोटार वाहनधारकांची नोंदणी, विमा, पियूसी, वाहन परवाना आदींची पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत. विशेष करून याची मुदत संपलेल्या वाहनधारकांना नूतनीकरण करण्यात अडचणी आल्या आहेत. यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासाठी ३० जून २०२० पर्यंत मुदत दिली होती. आज याबाबत नवीन निर्णय घेण्यात आला असून ही मुदत ३० सप्टेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.