नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मोदी सरकारने एअर कंडिशनर आणि एलईडी आता देशातच उत्पादनावर भर देण्याचा निर्णय घेतला सरकारने या कंपन्यांना 4500 कोटी रुपयांचा इनसेंटिव्ह दिला. यामुळे देशात रोजगाराची संख्या वाढेल आणि या वस्तू आयातही कराव्या लागणार नाही, अशी भूमिका सरकारने मांडलीय.
केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली
पीयूष गोयल म्हणाले, “या निर्णयामुळे अनेक नव्या नोकऱ्या तयार होतील. वीजेच्या किमतीवरही नियंत्रण येईल. थेट स्वरुपात जवळपास 32 हजार लोकांना रोजगार मिळेल. अप्रत्यक्षरित्या जवळपास 1 लाख लोकांना नोकऱ्या मिळतील, अशी आशा आहे. केंद्र सरकारने व्हाईट गुड्सबाबत हा निर्णय घेतलाय. व्हाईट गुड्स म्हणजेच एअर कंडीशनर, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा दैनंदिन वापराच्या इलेक्ट्रिक वस्तू होय. या वस्तूंच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने पीएलआय योजनेची घोषणा केलीय.”
“एक काळ होता जेव्हा भारतात एअर कंडीशनर बनायचे. मात्र, हळूहळू या क्षेत्रात परदेशी कंपन्यांनी आपला जम बसवला. आता देशात 70-80 टक्के एअर कंडीशनर परदेशातून आयात करावे लागतात ही परिस्थिती आहे. म्हणूनच सरकारने यासाठी पीएलआय योजनेची घोषणा केलीय. जसजशी देशातील समृद्धी वाढेल तसतशी देशातील या वस्तूंची मागणीही वाढेल. या वस्तूंचा एकत्रित वार्षिक वाढीचा दर 15-20 टक्के आहे,” असंही गोयल यांनी नमूद केलं.
पुढील 5 वर्षांमध्ये या वस्तूंचं देशात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना 1.46 लाख कोटी रुपयांचा इंसेंटिव्ह देण्यात येईल. देशात वस्तूंचं उत्पादन झाल्याने भारताची आयात घटेल. देशात उत्पादन होईल तेव्हा आपोआप रोजगारही वाढतील.