चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा गांधी महाविद्यालयात काल (दि.७) सकाळी ‘केंद्रीय अर्थसंकल्प महाचर्चा २०२०’ आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व उपप्राचार्य डॉ.ए. एल चौधरी तसेच प्रसिद्ध उद्योगपती डॉ. निर्मल टाटीया यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी चार्टर अकाउंटंटचे पॅनल बोलाविण्यात आले होते. त्यांत प्रमुख म्हणून जळगाव येथील ऑडिटर सी.ए. पी.एम. शहा, चोपडा येथील सी.ए. सौ. प्रियंका टाटिया, सी.ए. पवन गुजराथी गुंतवणूक आर्थिक सल्लागार शिवम शर्मा उपस्थित होते.
प्रा.सी.आर. देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात बोलताना सांगितले की, अर्थसंकल्पावर व्यापार उद्योग क्षेत्र व तसेच विद्यार्थी व सी ए फायनल यांच्या प्रश्नांचे अर्थ त्यांच्या प्रश्नांची अडचणींची सोडवणूक व्हावी, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे व अर्थसंकल्पावर साधक-बाधक चर्चा घडून एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने सदरची अर्थसंकल्प महाचर्चा घेण्यात आली. सदर कार्यक्रमास पॅनलप्रमुख पी.एम. शहा तसेच सौ. प्रियंका टाटीया सी.ए. पवन गुजराथी फायनान्शिअल ॲनालिस्ट शिवम शर्मा आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. टाटिया यांनी सांगितले की, १३५ कोटी जनतेपैकी फक्त सात कोटी जनता आयकर भरत असते. समाजातील प्रत्येक घटक सुविधा घेत असतात समाजातील प्रत्येक घटकाने आयकराच्या प्रवाहात येऊन सरकारला आयकर द्यावा, जेणेकरून देशाचा विकास जलदगतीने होऊन देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल. तसेच देश स्वयंपूर्ण होऊ शकेल.
कार्यक्रमानंतर महाचर्चेस सुरुवात करण्यात आली. यात काही विद्यार्थ्यांनी तसेच सहा-सात व्यापाऱ्यांनी प्रश्न विचारले. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.डी.एस. सूर्यवंशी यानी सांगितले की, अर्थसंकल्पावरील चर्चेमुळे चोपड्यातील व्यापारी व उद्योग क्षेत्रातील व्यापारी बांधवांना काय करावे, यासंबंधी मार्गदर्शन मिळून त्यांना फायदा मिळू शकेल, तसेच विद्यार्थ्यांनाही कायद्यासंबंधी माहिती रोजगाराच्या संधी सरकारच्या विविध योजना यांची माहिती मिळून त्यांच्यामध्ये अद्यावत माहिती मिळून त्यांच्या ज्ञानात भर पडते. सदर कार्यक्रमास वाणिज्य विभागातील अकरावी कॉमर्स ते एमकॉम चे विद्यार्थी तसेच बीबीए बीसीए विद्यार्थी एम ए इकॉनॉमिक्स चे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा शैलेश वाघ व प्रा.एन. एच.पाटील चर्चेत सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमास व्यापारी क्षेत्रातील धीरज गुजराती, नरेंद्र तोतला, सुनील जैन, विवेक पोद्दार, दीपक राखेचा, सतीश जैन, जितेंद्र बोथरा, महेश देश व विनोद अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रविण जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.ए. एच.साळुंखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख प्राध्यापक सी.आर देवरे, प्रा.व्ही.पी. हौसे, प्रा.आर.पी. जैस्वाल, प्रा.कुणाल सोनार, प्रा. प्रमोद पाटील आदीनी परिश्रम घेतले.