नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ३ ते ५ मे दरम्यान देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक वाढ दिसून येईल”, अशी प्रतिक्रिया केंद्र सरकारला कोरोनाबाबत सल्ला देणाऱ्या पथकाच्या प्रमुखांनी दिली होती. आता केंद्र सरकारच्या टास्क फोर्समधल्या सदस्यांनी देशभरात कडक लॉकडाउन लावण्याची भूमिका मांडली आहे.
. शनिवारी केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत ४ लाख १ हजार नवे बाधित सापडले आहेत. जगभरात एका दिवसात सापडलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. दिवसभरात ३ हजार ५२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील परिस्थितीनं केंद्र सरकारसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच २० एप्रिल रोजी देशवासीयांना केलेल्या संबोधनात “लॉकडाउन हा शेवटचा पर्याय म्हणूनच राज्य सरकारांनी स्वीकारायला हवा”, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आता केंद्र सरकारच्याच टास्क फोर्सनं लॉकडाउन लावण्याच्या बाजूने भूमिका मांडल्यामुळे पंतप्रधान काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. देशात सध्या ५ राज्यांच्या निकालांची चर्चा असून आज या सर्व निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे.
टास्क फोर्सच्या सदस्याने काही आठवड्यापासून टास्क फोर्सचे सदस्य पंतप्रधानांना देशभर लॉकडाउन लावण्याचा पर्याय सांगत असल्याची माहिती दिली. “केंद्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सचा काही महिन्यांपासून हेच सांगण्याचा प्रयत्न आहे की आपण देशभरात लॉकडाउन लावायला हवा. त्या त्या राज्यांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्वरुपात निर्बंध लावण्याऐवजी राष्ट्रीय लॉकडाउनची गरज आहे असं ते म्हणाले.
आपण मुळातच कोरोनाकडे चुकीच्या बाजूने पाहात आहोत, असं टास्क फोर्सच्या या सदस्याने सांगितलं आहे. “आपण भुयाराच्या चुकीच्या टोकाकडे पाहात आहोत आरोग्य व्यवस्था अमर्याद वाढवता येणार नाहीत. ऑक्सिजन पुरवठा वाढवूनही तो अपुरा पडतो आहे. आपल्याला रुग्णसंख्या कमी करावीच लागेल. किमान दोन आठवड्यांसाठी आपण हे सगळं थांबवू शकलो, तर आपण रुग्णवाढ रोखू शकू. यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी देखील मदत मिळू शकेल”, असं ते म्हणाले.
लॉकडाउनची मागणी करताना टास्क फोर्सकडून तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. “पहिला मुद्दा हा आहे की वेगाने होणारा प्रसार फक्त लॉकडाउननेच नियंत्रणात आणता येईल. कोरोनाचा समूह प्रसार होतो, तेव्हा चाचण्या करणं कठीण होऊन जातं. त्यामुळे सगळेच पॉझिटिव्ह असल्याचं गृहीत धरून तुम्हा त्यांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखू शकता. आणि हे फक्त लॉकडाउनमुळेच शक्य आहे”, असं या सदस्याने नमूद केलं आहे.
“दुसरा मुद्दा म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढू लागला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपण हा प्रसार रोखण्यासाठी काही का करत नाहीत. अमर्याद रुग्ण, सुविधांचा तुटवडा यामुळे वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता आहे. तिसरा मुद्दा म्हणजे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या परिस्थितीत तातडीने लक्ष घालणं आवश्यक आहे. आरोग्य सुविधांची तिथे मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही”, असं देखील या सदस्याने नमूद केलं आहे.
अमेरिकन प्रशासनातील मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी एस. फौसी यांनी देखील याच धर्तीवर भारताला सल्ला दिला आहे. “भारतात फैलाव वेगाने होत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेड्स मिळत नाहीत. औषधांचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे रुग्णांसोबत सामन्य जनता अडचणीत आली आहे. भारतात यावेळी कठीण परिस्थिती आहे. त्यामुळे आता साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची गरज आहे. तरच रुग्णसंख्या कमी होईल.”, असं मत डॉ. फौसी यांनी मांडलं आहे. त्यामुळे आता साऱ्या देशाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात, याकडे लागलं आहे.