जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण परिसरातील गायत्री नगरात दुस-या मजल्यावरून पडून कैलास बाबुराव महाजन (वय -४२, रा.नशिराबाद) या मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास महाजन हे नशिराबाद येथे आई-मुलासह वास्तव्यास होते. बगिच्याची कामे करणारे ठेकेदार प्रकाश मराठे यांच्याकडे ते कामाला होते. मराठे यांनी गायत्री नगरातील एका बंगल्यातील काम घेतले होते. त्यामुळे कैलास हे शनिवारी २५ मार्च रोजी सकाळी कामाला आले होते. मात्र, सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक बंगल्याच्या दुस-या मजल्यावरून पडून ते त्यांच्या हाता-पायाला तसेच डोक्याला दुखापत होवून गंभीर जखमी झाले. इतर मजुरांना ही घटना दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना वाहनातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र, वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती महाजन यांना मृत घोषित केले. यावेळी मराठे यांच्यासह महाजन यांच्या नातेवाईकांची रूग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास विकास सातदिवे आणि ललित नारखेडे हे करीत आहेत.