दुचाकीच्या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू; एक गंभीर

जळगाव प्रतिनिधी|  शिर्डीहून दुचाकीने घरी परतणाऱ्या पोलिसाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शहराजवळील देवकर महाविद्यालयाच्या समोर घडली. यात दुसरा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, सागर रमजान तडवी (वय-३०) रा. हबर्डी ता. यावल ह.मु. पोलीस लाईन, जिल्हा पेठ हे पोलिस कर्मचारी असून रामानंदनगर पोलिस ठाण्याला अगोदर कार्यरत होते. जळगावात ते आईसोबत राहत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची शिर्डी येथील देवस्थानाला पोलिस बंदोबस्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती. दर आठवड्याला जळगाव येथे आईला भेटण्यासाठी येत होते. काल रात्री बारा वाजेच्या सुमारास पोलिस कर्मचारी संतोष बोरसे यांच्यासह सागर तडवी दुचाकीने (एमएच १९ डीएल ५३७०) जळगावला येण्यासाठी निघाले होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव-शिरसोली रस्त्यावरील देवकर वैद्यकीय महाविद्यालयाच्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने सागर तडवी याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला पोलिस कर्मचारी संतोष बोरसे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या बोरसे पोलिस कर्मचार्‍याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर मयत सागर तडवी याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

मयत सागर तडवीच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. प्राथमिक तपास पीएसआय रामकृष्ण पाटील करीत आहे.

Protected Content