दुकानांचा दंड माफ करून सील उघडावे ; व्यापारी महामंडळाचे मनपा आयुक्तांना निवेदन

 

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी दि.७ ते १३ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला. ७ दिवस लॉकडाऊन असल्याने दि.६ रोजी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. लॉकडाऊन संदर्भात नियमांचे उल्लंघन करण्याचा दुकानदारांचा कोणताही हेतू नसला तरी नागरिकांना आवर घालणे कुणालाही शक्य नव्हते. फिजीकल डिस्टनसिंग नसल्याने मनपा प्रशासनाकडून काही दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. दि.६ जुलै रोजी असलेली परिस्थिती लक्षात घेता ज्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून दंड वसूल न करता दुकानांचे सील उघडावे अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

 

जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार दि.७ ते १३ जुलै दरम्यान जळगाव शहरात पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. ७ दिवस बाजारपेठा व दुकाने पुर्ण बंद रहाणार असल्याने दि.५ व ६ तारखेला जळगाव शहरामध्ये नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली होती. जळगाव शहरातील सर्वच दुकानावर ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसून आली. या मोठ्या गर्दीमुळे व्यापारी फिजीकल डिस्टनसिंग व सॅनिटायझिंग या नियमांचा अवलंब करू शकले नाही. कोव्हिड-१९ म्हणजेच कोरोनासारख्या आजाराशी लढतांना नियमांचे पालन करणे हे व्यापाऱ्यांचे नैतिक व सामाजिक कर्तव्य आहे. याची प्रत्येक व्यापारी बांधवास जाणीव आहे. नियमांचे उल्लंघन करण्याचा कोणत्याही व्यापारी बांधवाचा उद्देश नाही. त्यामुळे दि.५ व ६ तारखेला झालेल्या गर्दीसाठी दुकानदारांना वैयक्तिक जबाबदार न धरता व त्यांना कोणताही दंड न लावता दुकानांचे सील उघडून द्यावे अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा व सचिव ललित बरडीया यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.

Protected Content