दुःख पचवायला आणि आनंद वाटायला शिकले तर जीवन सुंदर बनते – शिंदे

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | धी शेंदुर्णी सेकंडरी एज्यू. सोसा. ली. शेंदुर्णी संचलित, आचार्य बापूसाहेब गजाननराव गरूड फाऊंडेशन, शेंदुर्णी आयोजित आचार्य गजाननराव गरूड यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून ही व्याख्यानमालेचे 14 वे वर्ष होते. आज पुष्प दुसरे प्रसिध्द वक्ते गणेश शिंदे (पुणे) यांनी जीवन सुंदर आहे, या विषयावर विचार गुंफले.

पुढे सांगितले की, जीवन जगण्याची कला अवगत करता आली आणि व्यक्त होणं जमलं तरच जीवन सुंदर वाटेल. इतरांच्या जीवनात आपल्यामुळे परिवर्तन झालं पाहिजे. श्वास आहे तोपर्यंत आनंदाने भरभरुन जगता आलं पाहिजे. नव्या पिढीशी संवेदनशील नातं ठेवावे लागेल. रडत न बसता परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग शोधावा लागेल. प्रचंड स्पर्धा, ताण – तणाव असेल तर असू द्या स्वतःवर विश्वास ठेवा नक्कीच यश मिळते. माणुसकी जिवंत ठेवा, माणसं जोडा आणि दुसऱ्याच्या उपयोगी पडा आयुष्य खूप सुंदर आहे. जेव्हा आपण येतो तेव्हा जग हसत असतं असं कार्य करावं की आपण गेल्यावर जगाने रडलं पाहिजे. जीवन पुन्हा नाही. ते सुंदर आहे. फक्त दृष्टी बदलली तरी सृष्टी चांगली दिसेल. चला आनंदाने जगूया. आपण असं कार्य करावं की इतिहासाला आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवावी वाटली पाहिजे. आपल्या ओघवत्या आणि भावनिक शैलीने शिंदे सरांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

प्रास्ताविकातून व्याख्यानमाला आयोजनाचा उद्देश्य प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांनी व्यक्त केला. संस्थेचे चेअरमन श्री संजय गरूड यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना बापूसाहेब गजाननराव गरूड यांच्या विचारांचा वारसा आपल्याला पुढे नेण्याचे आवाहन केले तसेच बापूंचे कार्य आणि शेंदुर्णीचा इतिहास यावर भाष्य केले.

याप्रसंगी संस्थेचे सचिव सतिष चंद्र काशीद, संचालिका सौ. उज्वलाताई काशिद, संस्थेचे सहसचिव दिपक गरूड, संचालक सागरमल जैन, संचालक श्री यू. यू. पाटील, संचालिका देवश्री काशिद, संचालक अभिजीत काशिद, आचार्य बापुसाहेब गरूड फाऊंडेशन चे सचिव कैलास देशमुख, प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, प्राचार्य एस. पी. उदार, सर्व पत्रकार बंधू, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद, पालक, पंचक्रोशीतील नागरिक तसेच विदयार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. योगिता चौधरी यांनी केले तर आभार डॉ. महेश पाटील यांनी मानले.

Protected Content