मुंबई : वृत्तसंस्था । दिवाळी आधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यांची माहिती दिली.
परतीच्या पावसानं राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात प्रचंड पाऊस झाला. ऐन काढणीवर आलेली पिकं भुईसपाट झाली होती. अनेक भागात तर पिकंच वाहून गेली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांनी विविध भागांचे दौरे केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत राज्य सरकारकडून केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं होतं.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीबद्दलची माहिती दिली. निवडणूक आयोगाला मदत वाटपासंदर्भात पत्र देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरूवात होईल,” असं वडेट्टीवार म्हणाले.