शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ कै. डॉ.चारुदत्त साने यांच्या १६ व्या स्मृती दिनानिमित्त येथील सरस्वती विद्या मंदिर व श्रीकृष्ण माध्यमिक विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. साने यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
शेंदूर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात कै.डॉ.चारुदत्त साने यांच्या स्मृतीस उजाळा देतांना शेंदूर्णीकरांचे सहकार्य व शिक्षकांच्या मेहनतीने त्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून डॉ. कौमुदी साने यांनी मनस्वी समाधान व्यक्त केले. तर कै.डॉ.साने यांचा आरोग्य सेवेचा वारसा पुढे चालत रहावा म्हणून डॉ.कल्पक साने हे शेंदूर्णीकरांची सेवा करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी साने परिवाराने शेंदूर्णी पंचक्रोशीत वैद्यकीय व्यवसाय व सामाजिक, सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविल्याचे नमूद केले. साने यांनी वैद्यकीय सेवेबरोबरच शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिल्या ज्यामुळे त्यांचे कार्य अजरामर झाले आहे. त्यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पाहून त्यांच्या स्मृती जागृत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात डॉ.कल्पक साने,डॉ. हेडगेवार शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.कौमोदी साने,जेष्ठ भाजप नेते उत्तम थोरात,कडोबा सूर्यवंशी, विजय गुजर, प्रफुल्ल पाटील, सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील,श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापिका शीला पाटील यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. पंडित दीनदयाळ पतसंस्था चेअरमन अमृत खलसे यांनी कै.डॉ.चारुदत्त साने यांच्या निस्वार्थी सेवेबद्दल गौरवउद्गार काढले तसेच राजेंद्र भारुडे यांनी आपल्या भाषणात कै डॉ.साने यांच्या शैक्षणिक संस्थेच्या उभारणी मुळे गरिबांच्या मुलांना शैक्षणिक संधी प्राप्त झाल्याचे सांगितले.