दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत

नवी दिल्ली :वृत्तसंस्था ।  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाईसाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या मदतीची मागणी केली आहे

. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना त्याबाबत एक पत्र लिहिलं आहे.  पत्रात ऑक्सिजन आणि रुग्णालय उभारण्याची मागणी केलीय. 

  दिल्लीसाठी शक्य होईल तेवढे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध केले जावेत. त्याचबरोबर DRDO मध्ये ज्या प्रमाणे एका रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार अजून काही रुग्णालयांची उभारणी करण्यात यावी’, अशी मागणी सिसोदिया यांनी   केली आहे.

ऑक्सिजनच्या मुद्द्यावर सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, दिल्लीचा अद्याप गरजेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. रविवारी दिल्लीला 440 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. मात्र, दिल्लीचा कोटा हा 590 टन इतका आहे.  सध्या दिल्लीतील ऑक्सिजनची मागणी आता 976 मेट्रिक टन इतकी बनली असल्याचंही सिसोदिया म्हणाले.

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आणि संबंधित मुद्द्यांवर सोमवारी उच्च न्यायलयात सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराची मदत मिळावी यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं आहे.

 

संपूर्ण देशासह दिल्लीतील कोरोनास्थितीही बिकट होत चालली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. एका दिवसात 400 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा मोठा आहे. दिल्लीतील संसर्गाचं प्रमाण सध्या 31.66 टक्के आहे. जवळपास 50 ङजार 554 रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत.

 

गेल्या 24 तासांत दिल्लीमध्ये 20 हजार 394 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 16 हजार 966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजार 290 आहे. गेल्या 24 तासांत 24 हजार 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Protected Content