जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असतांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-१९ विषाणूच्या बाधेची चाचणी करण्यास सक्षम असणारी प्रयोगशाळा सुरू झाली आहे.
जळगावात कोरोनाग्रस्तांची संख्या चारशेच्या पार पोहचली आहे. आधी कोरोनाच्या बाधेचे मापन करणार्या चाचणीचा अहवाल विलंबाने येत असल्याने बाधितांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. यानंतर धुळे येथील प्रयोगशाळा सुरू झाल्यानंतर रिपोर्ट तुलनेत लवकर आले तरी यासाठी देखील दोन-तीन दिवस लागत होते. या अनुंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी कोविड रूग्णालयात प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली होती. याची काही दिवसांपासून चाचणी सुरू होती. तर शनिवारी ही प्रयोगशाळा प्रत्यक्षात सुरू झाल्याची माहिती रात्री उशीरा जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.
या प्रयोगशाळेत शनिवारी ३२ संशयितांचे कोविड-१९ विषाणूच्या बाधेबाबत घेण्यात आलेले स्वॅब सँपल्स तपासण्यात आले असून यातील १४ पॉझिटीव्ह तर १८ निगेटीव्ह असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. आता जळगावातच प्रयोगशाळा सुरू झाल्याने कोरोनाची चाचणी लवकरच होऊन बाधीतांवर उपचार तातडीने सुरू होतील. याचा अर्थातच कोरोनाच्या लढाईत उपयोग होणार आहे.