दिलासादायक : मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून एकाच दिवशी ८० रुग्णांची सुट्टी!

जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोना बाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ होत असली तरी कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण देखील अधिक आहे. रविवारी मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून ८० रुग्णांना कोरोना मुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सर्व रुग्णांशी संवाद साधत पुढील महिनाभर घरीच राहण्याचा सल्ला दिला तसेच भविष्यात कोरोना योद्धा म्हणून इतरांना जागरूक करण्याचे आवाहन केले.

मनपाच्या कोविड केअर सेंटरमधून रविवारी शहरातील ६९ तर ग्रामीण भागातील ११ अशा ८० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, डी.जे.शिवाचे संचालक किशोर पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया आदी उपस्थित होते. कोरोनामुक्त झालेल्या सर्वांचे महापौरांनी अभिनंदन करून भविष्यात इतरांना देखील जागरूक करण्याचे आवाहन केले. मनपा कोविड केअर सेंटरबाबत असलेल्या अडचणी व तक्रारींची देखील त्यांनी विचारणा केली.

Protected Content