Home Cities अमळनेर आधार बहुउद्देशीय संस्थेला ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’

आधार बहुउद्देशीय संस्थेला ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’

0
45

अमळनेर/वरणगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला व बालकांचे उपचार, पुनर्वसन आणि सामाजिक सक्षमीकरण, घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी सक्षम यंत्रणा तसेच वंचित घटकांसाठी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्थेला ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. स्नेहालय संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात आलेल्या या पुरस्कारामुळे आधार संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव झाला असून, अमळनेरसह जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

तीन दशकांपूर्वी एचआयव्ही आणि एड्स या शब्दांभोवती समाजात मोठी भीती आणि गैरसमज होते. कोणताही दोष नसताना एचआयव्हीची लागण झालेल्या महिला आणि बालकांना सामाजिक बहिष्कार, भेदभाव आणि अमानुष वागणुकीला सामोरे जावे लागत होते. उपचार, सहानुभूती आणि सामाजिक संधींपासून त्यांना दूर ठेवले जात होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्नेहालय संस्थेने १९९२ मध्ये उपचार आणि निवासी पुनर्वसनाची दिशा दाखवली. त्यानंतर १९९९ पासून जळगाव जिल्ह्यात डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद आणि प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हे कार्य पुढे नेण्यास सुरुवात केली.

लैंगिक कामगार महिलांमध्ये एचआयव्हीविषयी जनजागृती निर्माण करणे, एचआयव्हीसह जगणाऱ्या महिला व त्यांच्या मुलांना उपचार आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच आईकडून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे काम आधार संस्थेने सातत्याने केले आहे. गेल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील सुमारे १६ हजार एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांसोबत संस्था कार्यरत आहे. वंचित आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यातही संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आधार कार्ड, दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका, मिशन वात्सल्य, बाल संगोपन योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आरोग्य सुविधा आणि विविध विमा योजनांपर्यंत लाभार्थ्यांना पोहोचविण्यासाठी संस्थेने प्रयत्न केले. यासोबतच महिलांवरील कौटुंबिक अत्याचार, बालविवाह आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांविरोधातही संस्थेने प्रभावीपणे काम केले आहे.

महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटांसह विविध उपक्रमांचा आधार संस्थेने घेतला. महिलांना संघटित करणे, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, शासकीय योजनांशी जोडणे आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणे, या माध्यमातून संस्थेने केवळ मदतकार्य न करता दीर्घकालीन पुनर्वसनाचा दृष्टिकोन जोपासला आहे. आधार बहुउद्देशीय संस्थेच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तिचे काम आज देशासाठी पथदर्शी ठरत असल्याचे स्नेहालय संस्थेने नमूद केले. वंचित महिला आणि बालकांना केवळ तात्पुरती मदत न करता त्यांना आरोग्य, शिक्षण, सामाजिक सन्मान, हक्क आणि स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.

बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी औद्योगिक वसाहतीमधील स्नेहालय पुनर्वसन संकुल येथे पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे (MKCL) मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत प्रमुख संवादक म्हणून उपस्थित होते. नागेबाबा परिवाराचे कडुभाऊ काळे आणि स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आधार बहुउद्देशीय संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. भारती पाटील, पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानपत्र आणि पुस्तकांचा संच असे होते. या सन्मानामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळाले आहे. स्नेहालय संस्थेने आधार संस्थेच्या कार्याचा गौरव करताना, “जळगाव जिल्ह्यातील आपले कार्य आज संपूर्ण देशासाठी पथदर्शी बनले आहे. पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्काराने आपल्याला गौरविताना धन्यता वाटते,” अशा शब्दांत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक श्रीमती रेणू प्रसाद आणि सचिव प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी संस्थेला मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते, हितचिंतक तसेच सामाजिक कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. हा पुरस्कार संस्थेच्या दीर्घकालीन सामाजिक कार्याची दखल असून, भविष्यात वंचित महिला, एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्ती आणि बालकांच्या हक्क व पुनर्वसनासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तळागाळातील विविध सेवा कार्यांशी देणगीदार, कार्यकर्ते आणि तरुणाईला जोडण्यासाठी स्नेहालय संस्थेतर्फे १९९५ पासून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. सामाजिक क्षेत्रात पायाभूत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी ‘बा’, ‘बापू’ आणि ‘विनोबा’ पुरस्कार प्रदान केले जातात. याच परंपरेत यंदाचा ‘पूज्य विनोबा भावे सेवा पुरस्कार २०२६’ आधार बहुउद्देशीय संस्थेला मिळाला आहे.


Protected Content

Play sound