दाणाबाजारात ऑनलाईन लॉटरी दुकानांवर पोलीसांची कारवाई; चार दुकानांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दाणाबाजार परिसरात सुरू असलेल्या विनापरवाना ४ ऑनलाइन लॉटरी दुकानांवर शहर पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी १४ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चार ऑनलाईन लॉटरीच्या दुकानावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जुने बसस्थानक परिसरातील एका गाळ्यामध्ये गजानन लॉटरी, जय वाल्मीक लॉटरी, साईनाथ लॉटरी यासह आणखी एका लॉटरीच्या दुकानावर ऑनलाइन येणाऱ्या आकड्यावर ग्राहकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगाराचा खेळ सुरू असल्याची माहिती गुरुवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच शहर पोलिसांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने दुपारी ३ वाजता जुने बसस्थानक परिसरातील एका लॉटरीच्या दुकानात छापा मारला. त्याठिकाणी संतोष नामदेव खजुरे (रा.गोपाळपुरा) हा सट्टा खेळविताना आढळून आला. त्याला ताब्यात घेत त्याच्याजवळून २८ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुपारी तीन वाजता पहिला छापा मारल्यानंतर दुपारी साडेतीन वाजता लागलीच गजानन लॉटरी दुकानात छापा मारला. याठिकाणी रितेश सुभाष पांडे, गणेश श्रावण लेकुरवाळे, रमेश प्रभाकर जोशी, आकाश लक्ष्मण सोनवणे हे सट्टा खेळविताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून सुमारे ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. लागलीच ४ वाजता जय वाल्मीक लॉटरी येथील पोलिसांनी धाड टाकून लक्ष्मण सोनवणे, अनिल फालक, प्रदीप कोलते यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून ५९ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. साडेचार वाजता पुन्हा साईनाथ लॉटरी दुकानात पोलिसांनी छापा टाकल्यावर त्यांना अजय कोळी, राजू कोळी, सचिन जाधव, आकाश कोळी, अशोक मोरे, विनोद राठोड असे सट्टा जुगार खेळ खेळताना व खेळविताना आढळून आले. त्यांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून ८९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी गुरुवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

 

Protected Content