दरड आणि पुरामुळे राज्यात 6 हजार कोटींच्या नुकसानीचा अंदाज

 

मुंबई: वृत्तसंस्था । राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे  8 जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

 

राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे 6 हजार कोटी रुपयांची गरज आहे. पुरामुळं कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. एकूण सहा हजार कोटींचं हे नुकसान झाल्याचा सरकारचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत आदींसाठी पॅकेज देण्याकरिता सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी ते कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना देतील.  राज्याचं पुरामुळे झालेलं नुकसान आणि पूरग्रस्तांना द्यावयाची मदत यावरही चर्चा करणार आहेत.

 

उद्या बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावेळी राज्यातील पूरस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा होईल उद्याच पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल.  ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे अशा कुटुंबांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार होईल. जे बाधित आहेत त्यांना जमीन दिली जाईल. त्यांचं एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचं काम केलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं

 

Protected Content