जळगाव सचिन गोसावी । नवीन वर्षाचे स्वागत करतांना कोरोनाच्या आपत्तीमुळे शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. रात्रीच्या संचारबंदीच्या पार्श्वभूमिवर, आजपासून जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात येत असून यात विशेष करून ड्रंक अँड ड्राईव्ह करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिला.
राज्य सरकारने ५ जानेवारीपर्यंतर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. तर नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनातर्फे विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. ते म्हणाले की, आजपासून जिल्ह्यात पोलिसांची नाकाबंदी करण्यात येत आहे. यात विशेष करून ड्रंक अँड ड्राईव्ह करणार्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी शक्यतो घरी राहूनच नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन डॉ. मुंढे यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वच पोलीस स्थानकांमध्ये कर्मचार्यांची अपूर्ण संख्या पाहता एक हजार होमगार्डची कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी मदत घेतली जात असल्याची माहिती देखील डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
खालील व्हिडीओत पहा डॉ. प्रवीण मुंढे नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/867614137347467