त्रिमूर्ती फार्मसी महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा प्रणाली विकसित; विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढल्याने देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. ऐन परीक्षांच्या काळात संचारबंदी असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे याकरिता पाळधी येथील त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित त्रिमूर्ती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात “ऑनलाईन परीक्षा प्रणाली’ सुरु करण्यात आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास व चाचण्या घेण्यात येत आहे.

जवळपास महिनाभरापासून महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परीक्षा कधी होईल याबाबत अनिश्चितता असली तरी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करावा या हेतूने महाविद्यालयाने ही प्रणाली सुरु केली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांच्या टेस्ट सिरीज घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम मार्च महिन्यातच संपलेला असला तरी त्यांचा परीक्षेच्या दृष्टीने सराव व्हावा यासाठी प्राध्यापकांनी गुगल क्लासरूम, काव्होट, मॅन्टिमेटर टूल्स, झूम अँप आदी वेबसाईटचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांसाठी आभासी क्लासरूम तयार केली आहे. याद्वारे दररोज विद्यार्थ्यांचे ऑनलाइन लेक्चर घेतले जात जाहे. दिवसभरात ५ लेक्चर होतात. एकूण ३ बॅच तयार केल्या असून याद्वारे विद्यार्थी अभ्यास करत आहे. यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले जात आहे. सदर ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यासाठी पुण्याचे लॉकफिशर टेक्नॉलॉजीचे सहकार्य लाभले तर ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांना त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मनोज पाटील, सचिव सुनील पाटील, महाविद्यालयातील वरिष्ठ व अनुभवी प्राध्यापकांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.

Protected Content