पुणे, वृत्तसेवा । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहे. मात्र, पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुक्त झालेल्या नर्स आणि त्यांच्या पतीचं जंगी स्वागत करताना गर्दी जमावल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविकेसह चौघांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी ससून रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या दाम्पत्याचं स्वागत करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केले नसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नगरसेविका कदम यांनी या दाम्पत्याच्या स्वागतच्यावेळी ढोल-ताशा आणि पुष्पवृष्टी करत गर्दी जमवली. यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका तयार झाल्याने प्रशासनाने कठोर पावलं उचलली. निगडी पोलिसांनी नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुक्त झालेल्या ‘त्या’ नर्स आणि त्यांच्या पतीचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील वायरल झाली. याच प्रकरणाची गंभीर दखल घेत निगडी पोलिसांनी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार जणांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.