‘तो’ गुन्हा दाखल नव्हे तर न्यायालयात सादर करण्यात आलाय अर्ज

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दप्तरी हेराफेर केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी आणि इतरांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला नसून यासाठीचा अर्ज कोर्टात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया तसेच प्रसार माध्यमांतून ग्रामपंचायतीच्या दप्तरी हेराफेरी करून व खोटे दस्त तयार करून तक्रारदाराची व शासनाची फसवणूक केली म्हणून गटविकास अधिकारी आणि अन्य ५ जणांविरुद्ध मुक्ताईनगरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आल्याचे प्रसारित करण्यात आले होते. तथापि, परंतु त्यासंदर्भात न्यायालयात केवळ फौजदारी किरकोळ अर्ज दाखल करण्यात आला आहे तसेच सदर कामात न्यायालयाने अद्यापपावेतो यासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले नाहीत.

यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, मुक्ताईनगर पंचायत समितीचे कार्यक्षेत्रात असलेल्या कोर्‍हाळा ग्रामपंचायतीत ग्रामपंचायत सदस्या दुर्गा धनराज कांडेलकर या गैरहजर असतानासुद्धा त्यांचे नावे ग्रामपंचायतीत खोटा ठराव घेऊन बनावट माहिती ठरावात लिहिण्यासाठी सदर ठरावा पासून दस्तुरखुद्द सूचकासह अन्य ग्रामपंचायत सदस्यही पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समजते.सदर ठरावाच्या अनुषंगाने व दप्तरी दाखवलेल्या खर्चानुसार , टीसीएल पावडर खरेदी,क्लोरीन डोस मशीन बसवणे आणि जिल्हा परिषदेच्या शाळेस संरक्षक भिंत बांधणे अशा कामांवर १ लाख ७४ हजार ९६३ रुपये, ३८ हजार ५०० रुपये आणि २ लाख रुपये असे मिळून ४ लाख १३ हजार ४०६ रुपयांचा सरकारी मालमत्तेचा स्वतः व सामुहिक लाभासाठी अपहार केला.

आरोपी विरुध्द तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. सदर खटल्यामध्ये मुक्ताईनगर चे गटविकास अधिकार्‍यांसह इतर पाच जणांच्या विरुद्ध मुक्ताईनगर न्यायालयामध्ये फौजदारी अर्ज क्र. ४०/२०२२ नुसार फिर्यादी संतोष त्रंबक कोळी यांचे तक्रारीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. सदरचा किरकोळ फौजदारी अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला असून त्यावर १ एप्रिल २०२२ रोजी त्यासंदर्भात युक्तिवाद करण्यात येणार आहे.

यासंदर्भात कोणतेही आदेश नाहीत — पो.नि.खताळ
दरम्यान या संदर्भात पोलिसांना अद्याप कोणत्याच प्रकारचे कोर्टातर्फे आदेश प्राप्त झाले नसल्याचे मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी सांगितले.

Protected Content