तोतया IPS अधिकारी अडकला सापळ्यात!

 

 

वाराणसी: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील वाराणसीत पोलिसांनी एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. महिलांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवून तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता.

शहरातील वेगवेगळ्या भागांतील अनेक महिलांची अखिलेश मिश्रा या तोतया आयपीएस अधिकाऱ्याने फसवणूक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत.

अखिलेश मिश्रा हा सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोलीस गणवेशातील स्वतःचे फोटो पोस्ट करायचा. तो तरुणी आणि महिलांशी चॅटिंग करायचा. त्यांना मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. काही दिवसांपूर्वी अखिलेशने एका शिक्षिकेला मैत्रीच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केली. शिक्षिकेला अखिलेशने आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून १ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातला. तिला शंका आल्यानंतर तिने कँट पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत त्याला चौकाघाट परिसरातून अटक केली.

पोलीस चौकशी केली असता, अखिलेश याने रॉ अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना गंडा घातलेला आहे, अशी माहिती मिळाली. अखिलेश हा वाराणसीतील रोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहंशाहपूरचा रहिवासी आहे. सध्या अखिलेश पोलीस कोठडीत असून, त्याची चौकशी केली जात आहे. वाराणसीतील किती महिलांची अखिलेश याने फसवणूक केली आहे, याचा तपास केला जात आहे.

Protected Content